गडचिरोली दि, 21 एप्रिल : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (आत्मा), सोनापूर-गडचिरोलीच्या प्रमुख प्रीती हिरळकर यांनी आज सिरोंचा तालुक्यातील अंकिसा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आणि प्रगतशील शेतकरी विश्वेश्वरय्या कोंड्रा यांच्या कलेक्टर प्रजातीच्या आंबा फळबागेस भेट देऊन शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या भेटी दरम्यान मिरची उत्पादनातील अडचणी, हवामान बदलाचे परिणाम, शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुविधा आणि कलेक्टर आंब्याच्या भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक माहिती आणि प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली.
*मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन*
श्रीमती हिरळकर यांनी अंकिसा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. मिरची लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियेबाबत तसेच प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हवामान बदलामुळे मिरची उत्पादनावर होणारा परिणाम आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांवर विशेष भर देण्यात आला. याशिवाय, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, मिरची प्रक्रिया उद्योग, गोदाम बांधकाम यासारख्या सुविधांचा लाभ घेण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री चेतन पानबुडे, कृषी पर्यवेक्षक श्री एस. एस. शिंगणे आणि अनेक मिरची उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
*कलेक्टर आंब्याच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न*
श्रीमती हिरळकर यांनी सिरोंचा येथील प्रगतशील शेतकरी श्री विश्वेश्वरय्या कोंड्रा यांच्या कलेक्टर प्रजातीच्या आंबा फळबागेस भेट दिली. या आंब्याच्या वाणाला भौगोलिक मानांकन (Geographical Indication – GI Tag) मिळवून देण्यासाठी त्यांनी श्री कोंड्रा यांच्याकडून सखोल माहिती घेतली. कलेक्टर आंब्याची लागवड स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जॉर्ज यांनी विदेशातून आयात केलेल्या वाणापासून सुरू केली होती, त्यामुळे या वाणाला स्थानिक पातळीवर ‘कलेक्टर आंबा’ असे नाव पडले.सध्या सिरोंचा तालुक्यात केवळ पाच ते दहा शेतकऱ्यांकडेच हे वाण आढळते. या आंब्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे दोन ते अडीच किलोपर्यंत वाढणारे आकारमान, रसापेक्षा सलादीसाठी (टेबल पर्पज) ग्राहकांची पसंती, मोठ्या प्रमाणात साका आणि लहान आकाराची बी. हे वाण स्थानिक वातावरणास अनुकूल असून चांगले उत्पादन देते. श्रीमती हिरळकर यांनी भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक नियम, अटी आणि शर्तींबाबत श्री कोंड्रा यांना मार्गदर्शन केले आणि या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.या भेटीवेळी तालुका कृषी अधिकारी श्री चेतन पानबुडे, कृषी पर्यवेक्षक श्री एस. एस. शिंगणे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.
