काळबादेवी येथील ‘मुंबादेवी’चे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
मुंबई, दि. 30 : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ.दीपक सावंत, माजी मंत्री राज के. पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुंबादेवी प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रद्धा, आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानाच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे. या परिसरात अत्यावश्यक असणाऱ्या सोयी सुविधा लक्षात घेऊन त्या ठिकाणी दर्शन रांगा, वाहनतळ आणि आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या विकासाबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.