ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ तर राष्ट्रीय शिल्प पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

‘शिल्प गुरू’ पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक, ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित

कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामड्यापासून कोल्हापुरी चपला हाताने बनविण्याच्या कारागिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री.सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.सातपुतेंचा चामड्यापासून चपला बनविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.

अमर सातपुते हे या व्यवसायात वर्ष 2005 पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडिलांकडून चपला तयार करण्याचे बारकावे शिकल्याचे अमर यांनी मनोगतात सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक‍ ठिकाणी प्रदर्शनानिमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सूचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शिर्के यांनी 32 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून भरतकामाचे विशेष प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे त्यांनी सांगितले.

अभय पंडित यांना कुंभार कामासाठी वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.