ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

२५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात कौमी एकता सप्ताह

मुंबई, दि. 22 : राज्यात केंद्र शासनाने सन 1986 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘कौमी एकता सप्ताह’  19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संपूर्ण राज्यात साजरा  करण्यात येत आहे.

या सप्ताहात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मता दिवस, धर्मनिरपेक्षता, जातीयवाद विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणारे सभा, चर्चासत्रे व परिसंवाद आयोजित करावे,  अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देणारे, अन्य भागातील लोकांच्या भाषेचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने विशेष वाङमयीन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सप्ताहामध्ये 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीमधील व्यक्ती व दुर्बल घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी सभा व मेळावे आयोजित करणे, या सप्ताहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेखा लक्षात घेता प्रदर्शन, चर्चासंमेलन, चित्रपटाद्वारे माध्यमांचा उपयोग करुन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होईल, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमांतर्गत 19 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’, 20 नोव्हेंबर रोजी ‘अल्पसंख्याक कल्याण दिवस’, 21 नोव्हेंबर रोजी ‘भाषिक सुसंवाद दिवस’ तर आज 22 नोव्हेंबर रोजी ‘दुर्बल घटक दिवस’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत 23 नोव्हेंबर रोजी ‘सांस्कृतिक एकता दिवस’ साजरा करण्यात येईल, या अंतर्गत भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 24 नोव्हेंबर रोजी महिला दिन साजरा करण्यात येईल. या अंतर्गत भारतीय समाजातील महिलांचे महत्त्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 25 नोव्हेंबर रोजी जोपासना दिवस साजरा करण्यात येईल. या उपक्रमांतर्गत पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक संस्थांनी 19 ते 25 नोव्हेंबर, 2022 दरम्यान सकाळी प्रार्थनेच्या तासानंतर एक सभा घेण्यात यावी. सभेमध्ये राष्ट्रीय एकात्मता व ऐक्यभाव यासंबंधी विद्यार्थ्यांना समजेल अशा स्वरुपात विवेचन करण्यात यावे. सभेच्या अध्यक्षपदी संस्थेच्या सोयीप्रमाणे प्राचार्य किंवा विशेष निमंत्रित असावेत, तसेच या सप्ताहामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे विविध पैलू ठळकपणे निदर्शनास आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या सोयीनुसार राष्ट्रीय एकात्मतेवर प्रख्यात वक्त्यांची भाषणे, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ सामूहिकरित्या घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम करणे आणि राष्ट्रगीताचे सामूहिक गायन यापैकी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.