ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत (आज दु. 1 वाजेपर्यंत मिळालेल्या माहीतीनुसार) 261 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.
ओडिशातील बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकल्याची माहीती आहे. हा अपघात इतका भयानक होता की रेल्वेमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि काही लोक अक्षरशः बाहेर फेकले गेले.
एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहीतीनुसार, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्याचीही माहीती त्यांनी दिली आहे.
