ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज:भाग्यश्री आत्राम

मुलचेरा: निसर्गतः मिळालेल्या शारीरिक मर्यादेवर मात करण्याची पूरक अशी शक्ती परमेश्वराने सर्वच दिव्यांग बांधवांना दिलेली असते. फक्त त्यांना कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, एवढा विश्वास दर्शविण्याची गरज असते.एकदा हा विश्वास त्यांना मिळाला तर ते संपूर्ण जग जिंकण्याच्या मार्गावर यशस्वीपणे प्रस्थान करतील,असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता गडचीरोली जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुकास्तरावर 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.25 फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय,मुलचेरा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती युधिष्टिर विश्वास, माजी पंचायत समिती सभापती सुवर्णाताई येमुलवार, ग्रामपंचायत विवेकानंदपुरचे सरपंच भावना मिस्त्री, माजी सरपंच ममता विश्वास, गट विकास अधिकार एल.बी.जुवारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. एल.एस. मल्लिक, सहाय्यक प्रशासन अधिकारी पि.टी. उराडे, सहाय्यक लेखाधिकारी डी.डब्लू.तिजारे,पंचायत विस्तार अधिकारी एम्.एल.रामटेके,सांखिकी विस्तार अधिकारी आर.डब्लू. चक्रमवार आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी अश्या शिबिराच्या आयोजनामुळे खेड्यापाड्यात आणि अतिदुर्गम भागातील दिव्यांग बांधवांना नक्कीच फायदा होणार असून जिल्हा प्रशासन आणि मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन (मित्र) यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करतानाच त्यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांची आस्थेने विचारपूस करून प्रत्येक स्टॉल ला भेट देऊन पाहणी केली.यावेळी मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी शिबिरातून दिव्यांग बांधवांसाठी सुरू असलेल्या तपासणीची माहिती दिली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते, डॉ. मुकेश अत्यालगड़े, डॉ. सुमित मंथन्वार, डॉ. रोहन कुमरे, डॉ. सुमित पॉल, डॉ. स्मिता सालवे, डॉ. सचिन हेमके, डॉ. पूनम क्षिरसागर, डॉ. दिव्या गोस्वामी, अक्षय तिवाडे, प्रशांत खोब्रागडे, अजय खैरकर, नेहा कांबळे, दीक्षा सोनरखन, ग्रामीण रुग्णालय, मुलचेरा तालुका आरोग्य विभाग, मुलचेरा, पंचायत समिती, मुलचेरा अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, आशा, आशा गट प्रवर्तक तथा शहीद बाबुराव शेडमाके विद्यालयातील विद्यार्थी, शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्रमुख डॉ. नजमा मिर्जा, समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत व सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

संपूर्ण जिल्ह्यात 9000 दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा मानस

मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिरात सर्व प्रवर्गातील ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या 326 दिव्यांग व्यक्तींपैकी अतिरिक्त 20 अशा एकूण 343 दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र करिता तपासणी व निदान करण्यात आले. तपासणी व निदान झालेल्या पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑनलाइन पोर्टल द्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) आणि विविध योजनांचे माहितीपत्रक स्पीड पोस्ट ने घरपोच देण्यात येणार आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्र करिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य उपकरणाकरिता मोजमाप सुद्धा घेण्यात आले. लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य देण्यात येणार आहे. 18 ठिकाणी होणाऱ्या या विशेष शिबिरातून अंदाजे 9000 दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची माहिती आहे.