ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

NEET (UG)-2025 परीक्षा : परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

गडचिरोली, 2 मे : येत्या 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्यामार्फत NEET (UG)-2025 ही महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा गडचिरोली मुख्यालयातील पाच परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा शांततेत पार पडावी व परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरण मिळावे, यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार, परीक्षेच्या कालावधीत झेरॉक्स मशिन, फॅक्स, एसटीडी बूथ सुरू ठेवता येणार नाहीत. मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा आदी उपकरणांचा वापर तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश वर्ज्य आहे. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी, गाणी म्हणणे, भाषण करणे, घोषणाबाजी, वाद्य वाजविणे तसेच पाचपेक्षा अधिक व्यक्तींची गर्दी करण्यास मनाई आहे.

शस्त्र, धारदार हत्यारे, स्फोटके, दाहक द्रव्ये, किंवा इजा करण्यास सक्षम वस्तू घेऊन परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात येण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेच्या दिवशी या परिसरात अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेश निषिद्ध राहील.

तथापि, कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त पोलिस अधिकारी यांना हा आदेश लागू होणार नाही. या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या अनुषंगाने परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशाची मुभा असेल.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असून, हा आदेश फक्त परीक्षा कालावधी साठी अमलात राहणार आहे.