‘जीवन सुंदर आहे’ ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना
मुंबई, दि.१३ : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सुलभा आर्या यांनी केले. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. विविध सिनेमा, नाटक आणि कलाकृती यावेळी सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने १२ ते २० नोव्हेंबर २०२२ असे एकूण ९ दिवस कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जीवन सुंदर आहे‘ ही यावर्षीच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम, स्टॉल्स तसेच उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
१४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, बालचित्रपट महोत्सव असणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच आदिवासी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याकरता या महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच अंध, अपंग आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही कला सादरीकरणाकरता निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आहे.
अन्य विविध कार्यक्रमांत अंध विद्यार्थांचा संगीत सोहळा, महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण तसेच अन्य विविध कार्यक्रम असतील. मतिमंद, महिला बचत गट, तृतीयपंथीय आणि अपंगांकरिता विविध स्टॉल्सही येथे असणार आहेत.पु.लं. देशपांडे कला महोत्सवात नवोदितांना संधी देण्याचे धोरण असल्याने ज्यांनी मागील तीन वर्षात एकाही महोत्सवात मानधन घेतलेले नाही अशा कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.
दुसरा दिवस थरारक मर्दानी कलांनी गाजविला!
‘पु.ल. कला महोत्सवा’चा दुसरा दिवस छावा प्रतिष्ठान, अतीत जि.सातारा यांच्या थरारक मर्दानी कलांच्या सादरीकरणाने गाजला. यावेळी श्री. उदय यादव आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या साहसी कलांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. लाठीकाठी, तलवारबाजी, कुऱ्हाड, दांडपट्टा तसेच आगीच्या माध्यमातून केले जाणारे साहसी खेळ यांमुळे टाळ्या आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सर्वानी मनमुराद दाद दिली.
यानंतर नृत्य समशेर, ठाणे या तृतीयपंथीयांच्या लावणी नृत्य सादरीकरणाने महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर झाला. लावणीचे महाराष्ट्राच्या परंपरेतील योगदान मोठे असून या कलावंतांना महोत्सवाच्या निमित्ताने एक उत्तम व्यासपीठ मिळाल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली.
कलांगणात सादर झालेल्या लावणीच्या ह्या कार्यक्रमात सर्वच रसिकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची मोठी दाद कलाकारांना मोठी पावती देऊन गेली. ढोलकीच्या तालावर, ह्या लावणी नर्तकांनी धरलेला ताल लोकांना मंत्रमुग्ध करून गेला.
उद्याचे कार्यक्रम :
दुपारी ३:०० वा. गोष्ट ऑस्करची आणि मीनाक्षी पाटील दिग्दर्शित माहितीपटांचे सादरीकरण.
सायंकाळी ४:०० वा.: ‘कुणाल मोतलिंग’ दिग्दर्शित ‘माईम’ या कलेवर आधारित कार्यक्रम
सुयश म्हात्रे दिग्दर्शित बालनाट्य ‘योद्धा’ सायंकाळी ५:३० वा.
रात्री कलांगणात लहान मुलांचा स्टॅन्ड अप कॉमेडी आणि हास्य यांवर आधारित कार्यक्रम