ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पोहरादेवी जैव उद्यान प्रकल्पाचा आराखडा त्वरित तयार करावा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 15 : वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे जैव उद्यान उभारण्यात येणार असून यासाठीचा प्रकल्प आराखडा त्वरित तयार करावा, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील संत सतगुरु सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी जैव उद्यान संदर्भातील आढावा बैठक मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे, यवतमाळचे वनसंरक्षक व्ही. टी. घुले, निसर्ग पर्यटन मंडळाचे उपमहाप्रबंधक उमेश वर्मा, वाशिमचे उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, वन विभागाचे उपसचिव भानुदास पिंगळे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, साधारणपणे निसर्ग पर्यटन विकासाकरिता 1000 हेक्टर क्षेत्र आवश्यक असते. यापैकी 88 हेक्टर क्षेत्रात जैव उद्यान तर 12 हेक्टर क्षेत्रात मनोरंजन क्षेत्र तयार करण्यात येते. पोहरादेवी जैव उद्यान प्रकल्प साकारत असताना हे नेमके कसे असेल याबाबत पुन्हा एकदा पाहणी करुन येथील जमिनीबाबतचे सर्वेक्षण करण्यात यावे. पोहरादेवी जैव उद्यान प्रकल्पाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करुन त्यादृष्टीने काम होणे आवश्यक आहे. हे करीत असताना संपूर्ण कामाला गती देण्याबरोबरच कामाची गुणवत्ता टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

नियोजित आराखडा तयार करीत असताना या जैव उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची संख्या, जैव उद्यानात येण्यासाठी प्रवेश शुल्क, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च यासारख्या बाबींचा आराखडा तयार करताना अभ्यास होणे आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.