ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पीएम किसान योजनेत मोठा बदल, आता ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 12वा हप्ता…!!

केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दरवर्षी 6000 रुपये जमा करीत असते. दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून, या नवरात्रीत शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार आहे..

देशभरातील तब्बल 10 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, त्यात अपात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याचे समोर आले होते. त्यानंतर अशा शेतकऱ्यांकडून सरकारने आतापर्यंत घेतलेले पैसे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, आता या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून योजनेतून वगळले जाणार आहे..

पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकरी वगळण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-केवायसी’ करण्याचा निर्णय घेतला होता. अशातच या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ‘ई-केवायसी’ केलेले असेल, त्याच शेतकऱ्यांना 12वा हप्ता मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या घटणार, असा अंदाज आहे.

देशभरातील शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.. नवरात्रीत शेतकऱ्यांच्या खात्यावर 12व्या हप्त्याचे 2000 रुपये बॅंक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे समजते..

आतापर्यंत ‘ई-केवायसी’ केलेले नसल्यास, शेतकऱ्यांनी तातडीने ‘वेबसाईट’वर जाऊन हे काम करणं गरजेचं आहे. पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावरही ही प्रक्रिया करता येईल. 12वा हप्ता हवा असेल, तर शेतकऱ्यांना आता ‘ई-केवायसी’ करावेच लागणार आहे, अन्यथा या योजनेस मुकावे लागण्याची शक्यता आहे..

शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास, केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकही दिला आहे. 155261, 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच [email protected] यावर ई-मेल करुनही शेतकऱ्यांना तक्रार करता येईल..