ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षा प्रकल्पाचे लोकार्पण

ठाणे, दि. 11 (जिमाका) : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई आयुक्तालयाचे महत्त्व येत्या काळात आणखी वाढणार आहे. नवी मुंबई पोलिसांना वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भविष्याच्या दृष्टीकोनातून अधिक सक्षम आणि अत्याधुनिक व्हावे लागणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत महिला सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत नेरुळमधील सेक्टर 7 येथे उभारलेल्या महिला सहाय्यता कक्ष, सायबर पोलीस ठाणे तसेच महिला सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, आमदार सर्वश्री गणेश नाईक, रमेश पाटील, महेश बालदी, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त किशन जावळे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, संजय पडवळ आदी उपस्थित  होते.

यावेळी वाशी येथील सिडको प्रदर्शनी भवनात झालेल्या कार्यक्रमात निर्भया पथकासाठी दिलेल्या 10 चारचाकी व 40 दुचाकी वाहनाचे उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी निर्मिती केलेल्या निर्भया पथकावरील लघुपटाचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नवी मुंबई आयुक्तालयामार्फत नेरुळ येथे सावली सुरक्षितता उपक्रमांतर्गत महिला सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या सहाय्यता कक्षामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंबंधित सर्वच बाबी एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, निर्भया हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठ्या प्रमाणात सजगता निर्माण झाली. राज्यात महिलांसंदर्भातील कायदे कडक करण्यात आले आहेत. आता महिलांसंदर्भातील तक्रारींची दखल तत्काळ घेण्यात येत असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. महिलासंदर्भातील गुन्हे वाढले असले तरी अशा गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी महिला पुढे येत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अशा मानसिक रुग्ण असलेल्या गुन्हेगारांवर जरब बसविण्यात येत आहे. देशातील महानगरांमध्ये मुंबई सारखे सुरक्षित महानगर दुसरे नाही. मुंबई आणि नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये पोलिसांच्या मदतीमुळे व निर्भया पथकामुळे सामान्य महिलांना येथे सुरक्षित वाटते. इथल्या सतर्क आणि सक्षम पोलीस यंत्रणेमुळे या शहरांमधील महिला रात्री उशीरापर्यंत एकट्या प्रवास करू शकतात. महिला अडचणीत असल्याचे पोलिसांना कळविल्यानंतर तातडीने प्रतिसाद मिळतो. निर्भया पथकांमुळे प्रतिसादाची वेळ अधिक चांगली होईल.

स्मार्ट पोलिसिंग व तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा – गृहमंत्री

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले. कमांड अँड कंट्रोल सिस्टीम सुरु केली आहे. यामुळे पोलिसिंगमध्ये गुणात्मक बदल झाला आहे. तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. सर्वच गोष्टी पोलिसांच्या संख्येने नियंत्रित करता येत नाही. आपला देश मोठा आहे, आपली शहरे मोठी आहेत, तेथील आव्हाने वेगवेगळी आहेत. तंत्रज्ञानाचा व स्मार्ट पोलिसिंगचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. तंत्रज्ञानाधारित यंत्रणा वापरायला हवी. आजच्या काळात समाज माध्यम व डिजिटल माध्यमांमुळे आव्हाने वाढली आहेत. भविष्यात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात होतील. त्यासाठी सायबर कक्षाकडे महत्त्वाचा घटक म्हणून पहायला हवे. गुन्ह्यांमध्ये तांत्रिक पुरावे हे अधिक महत्त्वाचे असतात. त्यामुळे अशा पुराव्यांचा उपयोग करून गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. महिलांच्या संदर्भातील गंभीर गुन्ह्यांमध्ये आता 90 दिवसांमध्ये चार्जशीट पाठविण्याचे प्रमाण 60 टक्क्यांवर आहे ते 90-95 टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. महिलांविषयक खटल्यांमधील न्यायालयीन निर्णय लवकरात लवकर व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून राज्यात जलदगती न्यायालयाची संख्या वाढविण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

एखाद्या महिलेला त्रासातून, चुकीच्या गोष्टीतून बाहेर काढले तरी तिला समाजात योग्य स्थान मिळावे, त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शक्ती सदन ही योजना राबविण्यात येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही 50 शक्तीसदन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शक्ती सदनात येणाऱ्या महिलांना तीन वर्ष राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असून, त्या ठिकाणी त्यांचे समुपदेशन करण्यात येईल, त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे अशा पीडित महिलांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस महासंचालक रजनीश शेठ म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस सातत्याने कटिबद्ध आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना पोलीस दलातर्फे करण्यात येत आहेत. महिला सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पीडित महिलांना मदत मिळावी, यासाठी  पोलीस ठाणेस्तरावर कौटुंबिक हिंसाचार, अत्याचारग्रस्त महिलांचे समुपदेशन व कायदेविषयक सल्ला उपलब्ध करून देणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अत्याचार पीडितांना समुपदेशन देण्यासाठी विधी सल्लागार व महिला अधिकारी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोलीस ठाण्यात पीडित महिलांना योग्य वागणूक व मदत मिळावी, यासाठी राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात येतील. गुन्हे रोखण्यासाठी व उकल करण्यासाठी प्रत्येक शहरातील खासगी सीसीटीव्ही हे पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जोडणे आवश्यक आहेत, असेही श्री. शेठ यांनी सांगितले.

दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले की, आज महिला सुरक्षा हा विषय महत्त्वाचा आहे. महिलांसोबत काही अनुचित प्रकार घडत असल्यास नवी मुंबई पोलिसांच्या डायल 112, निर्भया पथकाला कळवावे. नवी मुंबई पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. महिला सहाय्यता कक्ष अहोरात्र तुमच्या संरक्षणासाठी तयार आहे. पोलिसांच्या मदतीसाठी आम्ही नेहमी तयार आहोत.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त श्री. भारंबे यांनी महिला सुरक्षा प्रकल्पाची माहिती दिली. श्री. भारंबे म्हणाले की, नवी मुंबई पोलीसांच्या निर्भया पथकासाठीच्या वाहनांचे लोकार्पण आज झाले. येत्या दोन महिन्यात आणखी 10 चारचाकी व दुचाकी वाहने देण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला प्रत्येकी एक निर्भया वाहन मिळणार आहे. गर्दीची ठिकाणे, मुलींची छेडछाड होणाऱ्या भागात ही वाहने गस्त घालत राहतील. डायल 112 उपक्रमास नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे तिथे येणाऱ्या सर्व महिलांना सर्वतोपरी मदत केली जाईल. जिल्हा नियोजन समितीमधून पोलिसांसाठी वाहने दिली जातात.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी सूत्रसंचालन केले. सावली इमारतीमध्ये महिला सहाय्यता कक्ष असून तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याच इमारतीमध्ये सायबर पोलीस ठाणेही स्थापन करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.