ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2: गडचिरोलीतील 36 हजार 70 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी

जिल्हास्तरीय कार्यक्रम 22 फेब्रुवारीला नियोजन भवनात आयोजित

गडचिरोली, 21 फेब्रुवारी: महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याचे वितरण सोहळा 22 फेब्रुवारी 2025 रोजी उत्सव स्वरूपात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम बालेवाडी, पुणे येथे होईल, ज्याचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आणि पंचायत समितींना दाखवले जाणार आहे. गडचिरोली जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात येथे दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 36,070 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्यात आली असून, 15,000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत केला जाणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सत्र होणार आहे.

हा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार असून जिल्ह्यातील सर्व लाभार्थी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींना या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.