विशेष माहिती :-
गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे लोक कधी नव्हे एवढे आरोग्याविषयी सजग झाले आहेत. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स (Insurance), मेडिक्लेम आणि इतर आरोग्यविषयक उत्पादने आणि सेवांची मागणी वाढली आहे. सध्याचा बिकट काळ पाहता अनेकजण आरोग्य विमा उतरवून घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, विमा उतरवून घेणे ही प्रत्येकालाच परवडणारी गोष्ट नाही.
अशा लोकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY ) हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये एकदाच माफक प्रीमियम भरून तुम्हाला विमा मिळतो. PMSBY अवघ्या 12 रुपयांच्या वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाखांचा कव्हर मिळतो.
मे महिन्यात प्रीमियमची रक्कम कापली जाते
केंद्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी PMSBY योजना सुरु केली होती. या योजनेतील 12 रुपयांचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यामधून कापला जातो. 31 मे रोजी प्रीमियमची रक्कम वसूल केली जाते.
18 ते 70 वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला PMSBY योजनेचा लाभ मिळतो. ही पॉलिसी खरेदी करताना तुमचे बँक खाते PMSBY योजनेशी लिंक करण्यात येते. पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपघातात अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांची रक्कम अदा केली जाते. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन PMSBY योजनेसाठी अर्ज करु शकता.
