ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महिला सक्षमीकरणास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

मुंबई,: राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त अंधेरी येथील मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री अरुणा इराणी, डॉ.भारत बालवल्ली, वीर सेनानी फाऊंडेशनचे कर्नल पत्की यांचा सत्कार करण्यात आला. मुक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता ठाकरे यांचेसह मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

देशासाठी अनेक कर्तृत्ववान महिलांनी आपले मौलिक योगदान आहे. राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी तसेच महिला भगिनींना ताकद देण्यासाठी मी भावासारखा पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने अनेक जण कार्यरत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य ‘मुक्ती फाऊंडेशन’ सारख्या संस्था करीत  आहे़, असे सांगून महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा सन्मान मुक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या संस्थेचे कौतुक केले.

महिला भगिनींनी ठरवलं तर अशक्य काम शक्य करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. माता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही आपल्यासाठी आदर्श उदाहरणे आहेत. देशाच्या प्रमुखपदी दोन महिला राष्ट्रपती म्हणून आजवर विराजमान झाल्या आहेत, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे असे सांगून मुक्ती फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षास व आज सन्मानित झालेल्या महिलांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचा तसेच देशसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद वीरांच्या वीरपत्नी व वीरमातांचा तसेच सुरक्षा दलातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी मुक्ती फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.