ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

चित्ररथाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी चित्ररथाद्वारे प्रचार आणि प्रसार करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी आपल्यासाठी लाभदायक योजनांची माहिती जाणून घेत त्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ररथाद्वारे योजनांच्या प्रसिद्धीचा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनांची माहिती याद्वारे दिली जाणार आहे. आज (दि. २५) जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून या चित्ररथाला रवाना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन (अहेरी) व नमन गोयल (एटापल्ली), जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा बँकेचे अग्रणी व्यवस्थापक प्रशांत डोंगले आदी उपस्थित होते.

चित्ररथाद्वारे योजनांची माहिती

या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना बॅनर आणि ऑडिओ जिंगल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना, बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांसारख्या योजनांचा समावेश आहे.

तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, रमाई घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी निवासी शाळा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, मागेल त्याला प्रशिक्षण योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना यांचा समावेश आहे.

नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी पंडा यांनी नागरिकांना आवाहन केले की, “शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन गरजू नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये फिरणाऱ्या या चित्ररथामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचेल आणि गरजूंना त्याचा फायदा होईल.”