एटापल्ली:- तालुक्यातील अति दुर्गम व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या पुन्नूर गावात पाण्याची समस्या मिटणार असून नुकतेच माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी माजी सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवर, सचिव सुमन दुर्वा, येमली चे सरपंच ललिता मडावी,माजी नगरसेविका सगुणा कांदो,सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच पुन्नूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व येतील जीवनमान उंचाविण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत दुर्गम भागातील पुन्नूर येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असून या निधीतून पाईपलाईन, विहीर खोलीकरण, नवीन टाकी बांधकाम व गावांतर्गत नव्याने पाईपलाईन करणे नळ कनेक्शन देणे इत्यादी कामे केली जाणार आहे.
पुन्नूर हे गाव कसनसूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असून याठिकाणी 43 लाख 64 हजार 359 रुपयांच्या निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेचे काम होत असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.
