नागपूर, दि. ४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ११ डिसेंबरचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत ते नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करण्यासाठी समृद्धी महामार्गाने रवाना झाले.
तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,अतिरिक्त पोलीस आयुक्त निवा जैन आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विमानतळाबाहेर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज समृद्धी मार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समृद्धी महामार्गावर वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. या महामार्गावरून सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथे पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री महोदय नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.