मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांसाठीच्या निवड समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारार्थी निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचे शासन निर्णय आज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आले.
विठाबाई नारायणगांवकर पुरस्कारार्थी निवड समिती पुनर्गठित
विठाबाई नारायणगांवकर पुरस्कारार्थी निवडण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. मंगलाताई बनसोडे करवडीकर, छाया अंधारे खुटेगावकर, प्रा. प्रवीण जाधव, प्रा. येागेश निकम, देवानंद माळी, डॉ. प्रकाश खांडगे या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.
—
ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार्थी निवड समिती पुनर्गठित
ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारार्थी निवडण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य/ वाड्मय लिहिणाऱ्या लेखकास दरवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष आणि सचिव हे सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. डॉ. अशोक कामत, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले, डॉ. मुकुंद दातार, राजेश महाराज देगलुरकर या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.
—
पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार निवड समिती पुनर्गठित
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव असतील. उस्मान खाँ, डॉ. आश्विनी भिडे- देशपांडे, प्रभा अत्रे, प्रज्ञा देशपांडे, पं. अजय पोहनकर या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.
व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित
मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्यांना व्ही. शांताराम जीवन गौरव आणि विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. व्ही. शांतराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. राजदत्त, सई परांजपे, सुधीर नांदगांवकर, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षासाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.
राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित
हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्यांना राजकपूर जीवनगौरव आणि विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव असतील. सुभाष घई, विवेक अग्निहोत्री, मोहन जोशी, मधुर भांडारकर, वेद राही या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार निवड समिती पुनर्गठित
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी निवड समिती पुनर्गठितकरण्यात आली आहे.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. विक्रम गोखले, गिरीश ओक, अशोक समेळ, अशोक सराफ या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
निवड समिती पुनर्गठित
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. अरविंद पिळगांवकर, शुभदा दादरकर, माधव खाडिलकर, भरत बलवल्ली या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षासाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या मान्यवरांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. पंडित ब्रिज नारायण, पंडित सत्यशिल देशपांडे, पंडित उल्हास कशाळकर, अशोक पत्की, अंबरीश मिश्र या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.