रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे आणि अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आता दहापट अधिक भरपाई देणार असल्याचं रेल्वे बोर्डाने जाहीर केलं आहे. रेल्वे बोर्डाने या भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार आता (Railway News) रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेच्या चुकीमुळे अपघात झाला तरीही त्याला आता भरपाई देण्यात येणार आहे. भरपाईमध्ये वाढ करण्याचा हा निर्णय 18 सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे.
रेल्वेच्या अपघातात जीव गमवावा लागलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना पहिले 50 हजार रुपयांची रक्कम भरपाई म्हणून देण्यात येत होती. आता त्यात 10 पट वाढ झाल्याने अशा प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत स्वरूपात मिळणार आहे. तसेच गंभीर जखमी रुग्णांना यापूर्वी 25 हजार रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम अडीच लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. तसेच किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना पूर्वी 5 हजार रुपये मदत दिली जात होती ती आता वाढवून 50 हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली तर मृतांचे नातेवाईक, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी प्रवाशांना दीड लाख रुपये, 50 हजार रुपये आणि 5 हजार रुपये अशी अनुक्रमे नुकसान भरपाई मिळेल. हा निर्णय होण्याची पहिले ही रक्कम 50 हजार रुपये, 25 हजार आणि 5 हजार रुपये अशी होती. यात दहशतवाद्यांचा हल्ला, हिंस्त्र हल्ला, आणि रेल्वे अशा गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
रेल्वेच्या अपघातानंतर 30 दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमी प्रवाशांना जास्तीची भरपाई मिळणार आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना 10 दिवसांच्या कालावधीत अथवा डिस्चार्ज झाला तेव्हाची तारीख या दोन्ही तारखांपैकी जे पहिले असेल त्या दिवशी 3 हजार रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाते. याव्यतिरिक्त रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील पाच महिन्यांसाठी शेवटच्या 10 दिवसांच्या कालावधीसाठी प्रत्येक दिवशी 750 रुपये दिले जातात.