मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत
राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत
मुंबई दि. १७ – जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार कक्षाचे कार्य सुरु असून अवघ्या चार महिन्यातच १ हजार ०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्वांना चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी मदत देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायता कक्ष वेगाने कामाला लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली या कक्षाच्या कामाच्या पद्धतीत, मदतीचे निकष यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून कक्षाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत गरजूंना मदतीसाठी अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी mahacmmrf.com हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नवीन आजारांचा समावेश
मुख्यमंत्री सहायता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात ह्रदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो व ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा वा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत केली जाईल तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी ५० हजार रुपये मदत मिळेल. या शिवायच्या अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.