राज्यात यंदा माॅन्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातलाय.. आता हा माॅन्सून परतीच्या वाटेवर निघालेला असला, तरी जातानाही तो मोठे नुकसान करुन जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान माॅन्सून परतीचा प्रवास करणार आहे. या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे..
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारपासून (ता. 5) परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.. हा परतीचा पाऊस पुढील काही दिवस तरी राज्यात थैमान घालण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे.
राज्यात उद्या (ता. 08) विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. तसेच, पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते. तसेच पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची चिन्हे आहेत. 11 व 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांना इशारा
कोकण – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र – नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा – औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.
विदर्भ- बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, माॅन्सून काही काळ मुंबईत तळ ठोकण्याची शक्यता आहे. मात्र, 10 ऑक्टोबरनंतर माॅन्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होईल व यंदाचा पावसाळा थांबेल. दसरा सणातही पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र, दिवाळीपर्यंत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.