ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना आढावा बैठक

राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. राज्याची सिंचन क्षमता वाढण्याच्या दृष्टीने या योजना महत्वपूर्ण असून यासाठी निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. कामे पूर्ण करण्यासंदर्भात जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री  श्री.फडणवीस यांनी दिले.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत 10 प्रकल्प पूर्ण झाले असून 17 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत तर बळीराजा जलसंजीवनी योजनेत 46 प्रकल्प पूर्ण झाले असून 45 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे सर्व प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.