ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पोंभूर्णा (चंद्रपूर) येथील अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईदि. 7 : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी फेरआढावा घेऊन अतिवृष्टी संदर्भात शासनाकडे नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात 2022 मध्ये जुलैऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री शोभाताई फडणवीसचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह चंद्रपूरचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले कीचंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत बाधित शेतकऱ्यांना का नुकसान भरपाई दिली नाही, याबाबत चौकशी करुन याबाबतच्या चुका दुरुस्त करुन घ्याव्यात. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे तलाठीग्रामसेवक आणि कृषी सहायक अशा त्रिस्तरीय समितीकडून करण्यात आले होते ते तपासून घ्यावेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान भरपाई न मिळालेले शेतकरी हे नदीच्या काठावरील असलेल्या गावात राहत असून त्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देताना केलेले पंचनामे तपासून घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईबाबतचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे तातडीने सादर करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.