राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार
मुंबई, दि. २३ : राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कराराप्रसंगी आयुक्त डॅा. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, लाईटहाऊस कम्यूनिटीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रूची माथूर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या करारानुसार कौशल्य, रोजगार, उद्योगजकता आणि नाविन्यता विभाग आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील मागास जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात रोजगारासह कुशल मनुष्यबळाचा विस्तार करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ‘लाईटहाऊस : कौशल्य आणि उपजीविका केंद्र’ (Lighthouse: Center for Skilling and Livelihoods) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्यक्रमाद्वारे कमी उत्पन्न असलेल्या समुदायांसोबत काम करणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना सशक्त करणे आणि त्यांच्यात क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. या सहभागातून, लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन संपूर्ण राज्यामध्ये लाईटहाऊस केंद्रांद्वारे कौशल्य आणि उपजीविका कार्यक्रम राबवेल, ज्यामध्ये भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र आधारित मॉडेल करिअर सेंटर्स (MCC) आणि 18-35 वयोगटातील ग्रामीण तरुण वर्गाचा समावेश असलेल्या आकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य देईल. हा सहा महिन्यांचा कार्यक्रम असेल. ज्याची सुरुवात मूलभूत अभ्यासक्रम, करिअर समुपदेशन आणि व्यावसायिक प्रशिक्षणापासून ते कार्यक्रम पूर्ण झाल्यावर उद्योग भागीदारांसह रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत होईल.
