ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६५ वर्षाखालील महिला-पुरुष, अनाथ मुले, अपंग,विधवा व घटस्फोटित महिला आणि गंभीर आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणाऱ्या निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येते. संजय गांधी निराधार योजना (महाराष्ट्र) लाभ मिळविण्यासाठी संजय गांधी निराधार योजना पात्रता, संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे, संजय गांधी निराधार योजना अनुदान (आर्थिक लाभ) आणि संजय गांधी निराधार योजना फॉर्म Online कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.

संजय गांधी निराधार योजना पात्रता:

१. संजय गांधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. लाभार्थी व्यक्तीचे वय किमान १८ ते ६५ वर्षापेक्षा कमी असावे.

३. लाभार्थी व्यक्तीचे नाव दारिद्ररेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असावे.

४. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २१,०००/- पर्यंत असायला हवे. तर दिव्यांग व्यक्तींसाठी रु. ५०,०००/- पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न उत्पन्न असणारे व्यक्ती अपात्र असतील.

संजय गांधी निराधार योजना पात्रता निकष अटी:

१. अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद इत्यादी अपंगत्व प्रवर्गातील स्त्री व पुरुषांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो.

२. क्षयरोग, पक्षाघात, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग इत्यादी सारख्या आजारांमुळे स्वतःचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम नसणारे स्त्री व पुरुष.

३. निराधार पुरुष, महिला तृतीयपंथी विधवा, घटस्फोटीत पोटगी न मिळणाऱ्या स्त्रिया, देविदासी, परीत्यक्ता, अत्याचारित महिला आणि वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला व तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस.

४. १८ वर्षाखालील अनाथ, अपंग आणि इतर दुर्धर आजाराने ग्रस्त मुले/मुली.

५. ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री जिला कुठलाही आधार नसेल.

६. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कुटुंब.

संजय गांधी निराधार योजना अटी व नियम:

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळविण्यासाठी पात्र असेलेल्या लाभार्थीने विहित नमुना अर्जामध्ये, लाभार्थी रहात असलेल्या भागातील संबंधित तलाठयाकडे अर्ज करता येतो. अर्जासोबत लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडावीत.

तलाठी प्राप्त अर्जाची तपासणी करुन अर्जासोबत जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत, त्यांची व अर्ज कोणत्या योजनेसाठी दिलेला आहे, याची सविस्तर नोंद नोंदवहीमध्ये करून व अर्जदाराला विहित नमुन्यात पोच पावती द्यावयाची असते.

तलाठी यांनी नोंदवही ठेवणे व त्यामध्ये अर्जाची नोंद ठेवणे बंधनकारक असते.

तलाठीकडून पडताळणी करुन अर्ज संबंधित तहसिलदार / नायब तहसिलदार यांचेकडे पाठविला जातो. आलेल्या अर्जाची छाननी व प्रत्यक्ष पडताळणी संबंधित तहसिलदार /नायब तहसिलदारकडून केल्यानंतर  अर्जदारांची यादी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीसमोर प्रत्येक महिन्यास निर्णयासाठी ठेवावी लागते. प्राप्त झालेल्या अर्जाची अंतिम छाननी करून लाभार्थ्यांची निवड समितीमार्फत केली जाते.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे:

१) वयाचा दाखला

वयाचा दाखला म्हणून खालीलपैकी एक पुरावा ग्राह धरला जाईल.

१. जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत

२. शाळा सोडल्याचा दाखला

३. शिधापत्रिकेमध्ये किंवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा.

४. आधार कार्ड

५. ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.

२) उत्पन्नाचा दाखला

वयाचा दाखला म्हणून खालीलपैकी एक पुरावा ग्राह धरला जातो.

१. तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला

२.  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्‍ती / कुटूंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांक्षाकित उतारा.

३) रहिवासी दाखला

१. ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी दिलेला दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.

४) अपंगाचे प्रमाणपत्र

अस्थिव्यंग, अंध, मुकबघिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्‍ती अधिनियम १९९५ मधील तरतूदीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन ) यांचे प्रमाणपत्र.

५) असमर्थतेचा / रोगाचा दाखला

१. जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन), शासकीय रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक यांनी दिलेला दाखला.

२. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला.

३. तहसिलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरुन दिलेला दाखला व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला.

६) अनाथ असल्याचा दाखला

ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला.

संजय गांधी निराधार योजना अनुदान:

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नाव नसलेल्या आणि रु. २१०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस मिळणाऱ्या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्‍कम दरमहा रुपये १०००/- एवढी करण्यात आली.

त्याचप्रमाणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अपत्य नसलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ४००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्‍कम दरमहा रुपये १०००/- एवढे अनुदान देण्यात येते.

१ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ५००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्‍कम दरमहा रुपये ११००/- आणि २ अपत्य (२ व त्यापेक्षा अधिक अपत्य) असलेल्या विधवा लाभार्थ्यांना मिळणा-या दरमहा रुपये ६००/- अर्थसहाय्यात रुपये ६००/- इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्‍कम दरमहा रुपये १२००/- अशी करण्यात आली.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी ६५ वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या निकषांच्या अधीन राहून लाभ देण्यात येतो.

संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र ऑनलाइन फॉर्म अर्ज:

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या संकेतस्थळावर भेट द्यावी.

१. आपले सरकार पोर्टलवर सर्वप्रथम लॉगिन करावे. जर नोंदणी केली नसेल तर नवीन यूजर या पर्यायावर क्लीक करून संकेतस्थळावर नोंदणी करून घ्यावी.

२. लॉगिन केल्यावर पेजच्या डाव्या बाजूला ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग’ हा पर्याय निवडून ‘पुढे जा’ हा पर्याय निवडा.

३. त्यानंतर, नवीन पेजवर ‘विशेष सहाय्य योजना’ हा पर्याय निवडा.

४. यानंतर, आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती वाचून ‘पुढे सुरु करा’ पर्याय निवडा.

यानंतर, तुमच्या पुढे ऑनलाईन अर्ज उघडेल, त्यामध्ये अर्जदाराचा वैयक्तिक तपशील भरा. (जन्मतारीख, वय, दारिद्र रेषेखालील तपशील, नाव इत्यादी).

पुढे, निवासी पत्ता, बँक खात्याचा तपशील इत्यादी अर्जामधील सर्व माहिती व्यवस्थित भरून ‘अर्ज जतन करा’ यावर क्लीक करा. त्यानंतर विचारलेल्या कागदपत्रांची माहिती पाहून त्यांची PDF फाईल अपलोड करावी. यांनतर रु. 33/- ऑनलाईन Payment करून झाल्यावर सबमिट केलेला अर्ज अंतिम मंजुरीसाठी तहसील कार्यालयात पाठविला जातो.

संजय गांधी निराधार योजना ऑफलाईन अर्ज पद्धत:

संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी, जिल्हा अधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी कार्यालययात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज मिळवता येतो किंवा इथून डाऊनलोड करू शकता. अर्जातील सर्व माहिती भरून, आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करावा.

संजय गांधी निराधार योजना अर्ज – फॉर्म PDF DOWNLOAD

संजय गांधी निराधार योजना हेल्पलाइन नंबर: 1800-120-8040