सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांना प्रवेश
आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्यास आरटीपीसीआर चाचणी व विनियमन बंधनकारक
जिल्हा प्रशासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी
नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचीही तरतूद
गडचिरोली: राज्यांतील कोविड- 19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये, निरंतर व सातत्याने घट होत आहे. आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड 19 विषयक निर्बधांचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त बाळगण्यामुळे यश प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेता, पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी संदर्भिय पत्रान्वये राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंधाना शिथीलता देण्याचे आदेश निर्गमित केलेले आहे.
त्यानुसार संजय मीणा, जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली, यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून कोविड- 19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या संबधातील जिल्हा प्रशासनाच्या यापूर्वीचे सर्व आदेशांचे अधिक्रमण करुन तात्काळ प्रभावाने नवीन आदेश दिले निर्गमित केले आहेत. सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन विषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी ,विविध स्थनिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार, पुढील शर्तीना अधीन राहून खुले करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन, राज्य शासन व केंद्र सरकार यांनी वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे सेवा प्रदाते, परिवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरूप वर्तन संबंधितील मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
*संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता* : अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणार्याव व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी), अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे. आ. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे), इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे देखील संपूर्ण लसीकरण झालेले असावे. इ. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. ई. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.
*गडचिरोली जिल्हयात प्रवास*: कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे या बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांद्वारे विनियमन करण्यात येईल. जिल्ह्यात इतर देशातुन तसेच इतर राज्यातुन येण्याचा प्रवाशांचे यापुढे नमूद केलेल्या व्याख्यानुसार संपूर्ण लसीकरण केलेले आवश्यक असेल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील.
*इतर* – चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त / बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची अनुमती असेल. संपूर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची अनुमती असेल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे) अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असेल. जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला तसेच स्थानिक प्रशासनास त्याची माहिती देणे अनिवार्य असेल. कोविड-19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, कार्यक्रम ठिकाणी कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रतिनिधीला कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा अधिकार असेल.
*संपूर्ण लसीकरणाची व्याख्या*: संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे किंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्या व्यक्तीला लस घेणे शक्य नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती,असा आहे किंवा 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.
*कोविड योग्य/ अनुरूप वर्तन*
१. नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड़ नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.)
२. शक्य असेल तेथे नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा.
३. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ धुवा.
४. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
५. योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.
६. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा.
७. खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला
कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिंकावे.
८. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
९. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) राखा.
१०. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार / अभिवादन करा.
११. कोविड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.
*दंड*:
● या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 500/- इतका दंड करण्यात येईल.
● ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तनाची अमलबजावणी करण्यामध्ये नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
● जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत: च कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये 50,000/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
● जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजंन्सीस, कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, संबंधित मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.