महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत व महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर जनरल (मेल्स आणि बीडी) अमिताभ सिंग यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
टपाल खाते व ‘माविम’ यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना देश-विदेशात विना अडथळा व जलदरित्या आपली उत्पादने पाठवणे आता सहज शक्य होणार आहे. या पुढे जाऊन टपाल विभाग महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्रीसाठी मदत करणार आहे. हा उपक्रम प्रथम प्रायोगिक प्रकल्प म्हणून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात विस्तार करण्यात येईल, असे महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या.
या करारमुळे करारामुळे सीएमआरसी या टपाल खात्याच्या वाहतूक बीएनपीएल (BNPL – Book Now Pay Later) व्यवस्था म्हणून काम पाहतील. या व्यवस्थेमुळे सीएमआरसी त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांच्या उत्पादनांची कॅशलेस आणि कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने विक्री करू शकणार आहेत. यामुळे महिलांची उत्पादने महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर देश विदेशात पोहोचविणे शक्य होणार आहे.
मंत्री कु. तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माविम’ नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. बचतगटांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टपाल विभागाची देशभरात १ लाख ६० हजार कार्यालये आहेत. ‘माविम’च्या गटांना पिकअप सुविधा देखील टपाल खात्याकडून पुरविण्यात येणार आहे. या गटांना जास्त सेवा वापरल्यास सवलत देखील देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचतगटांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड यांनी केले.
या श्री. सिंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजिंक्य काळे यांनी आभार मानले
