मुंबई, दि 8 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायं. 6.00 वाजता www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. 07/11/2022 ते 17/12/2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता रु. 50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. 17/11/2022 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परिषदेच्या सहायक आयुक्त स्मिता गौड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.