नोएडामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू
भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सर्वच शहरांमध्ये वारंवार चर्चेचा विषय ठरतो. या कुत्र्यांनी काही व्यक्तींवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना दिल्ली एनसीआरमधील नोएडा भागात घडली आहे. काही भटक्या कुत्र्यांनी एका सात महिन्यांच्या चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराची अक्षरश: चिरफाड केल्याचा भीषण प्रकार नोएडाच्या सेक्टर १०० मधल्या एका सोसायटीमध्ये घडला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये चिमुरड्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून आता सोसायटीतील रहिवाशांनी या समस्येवर तातडीने पावलं उचलण्यासाठी नोएडा प्रशासनावर दबाव आणायला सुरुवात केली आहे.
नोएडातील उच्चभ्रू सोसायटीतील घटना
नोएडा सेक्टर १०० मधल्या लोटस बॉलेव्हर्ड या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारात एक बांधकाम सुरू होतं. त्यासाठी हा चिमुरडा आणि त्याची आई या ठिकाणी आली होती. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये अनेक भटके कुत्रे असून त्यांना सोसायटीच्या आवारातच खायला घातलं जात असल्याचीही माहिती इथल्या रहिवाशांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली.
प्रशासनाकडून दुर्लक्षाचा स्थानिकांचा आरोप
हा प्रकार उघड झाल्यानंतर तातडीने या चिमुकल्याला नोएडाच्या यथार्थ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. रात्रभर त्याची प्रकृती चिंताजनक होती. मात्र मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सातत्याने पुढे येत असूनही प्रशासनाकडून त्यावर कोणतीही पावलं उचलली जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.