छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलचेरा:छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे शनिवारी (७ मार्च) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानात भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर शिबिरात तहसीलदार चेतन पाटील, गटविकास अधिकारी विजय पेंदाम, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी अमरी रॉय, लगामचे सरपंच दीपक मडावी, चुटुगुंटाचे सरपंच साधना मडावी, शांतीग्रामचे सरपंच अर्चना बैरागी, येलाचे उपसरपंच दिवाकर उराडे तसेच नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांच्या समस्या व अर्ज स्वीकृतीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात आली. याअंतर्गत बरेच अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २२ अर्ज जागेवरच निकाली काढण्यात आले, तर उर्वरित अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात आले. विशेष म्हणजे महसूल विभागाकडून विविध प्रकारच्या असे एकूण ५३७ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.तसेच विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.यात कृषी विभागाकडून ३०, पुरवठा विभागाकडून ४८, संगायो कडून १४, भूमि अभिलेख कडून ४, उमेद बचत गटाकडून ७१, आधार केंद्रांकडून ३४ तर आरोग्य विभागाने देखील स्टॉल लावून ७१ रुग्णांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरात तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या विविध विभागांचा सक्रिय सहभाग होता. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली तर अर्ज प्रक्रियेसंदर्भात तहसीलदार चेतन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
लगाम परिसरातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी तसेच विविध विभागांच्या सहकार्याने तसेच प्रशासनाचा समन्वयामुळे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंडळ अधिकारी अरुण नागरगोजे यांनी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लगामचे ग्राम महसूल अधिकारी राहुल पोरतेट तर आभार गोमणीचे ग्राम महसूल अधिकारी गणेश उगले यांनी मानले.





