ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी मुंबईसाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण

मुंबई, दि. १७ : – मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावे असे धोरण आहे. यात धारावीचा पुनर्विकास हा महत्त्वाचा असून, येत्या काही काळात जगाचे लक्ष वेधून घेईल अशी वसाहत प्रत्यक्षात येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. तसेच मुंबईतील कुणाही गरजूला वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, असे होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामीण भागातही मुंबईतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजने अंतर्गत कार्यान्वित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील काळा किल्ला येथील दवाखान्याचे प्रत्यक्ष तसेच अन्य ठिकाणच्या ५१ दवाखान्यांचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांनुसार आमच्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून योजना राबवित आहोत. त्यांच्या प्रेरणेतून आपला दवाखाना योजना राबविण्यात येत आहे याचे मोठे समाधान आहे. या योजनेमुळे
नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा मोफत, व सोईच्या वेळेनुसार सहज उपलब्ध होतील. नागरिकांचा औषध उपचारावर खिशातून होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल.


योजनेत कमीतकमी जागेत पोर्टा केबिनमध्ये दवाखाने सुरू केल्यामुळे तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
माझ्याकडे काही काळ आरोग्य खात्याची जबाबदारी होती. त्यावेळी ठाणे परिसरात “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू केली होती. मुंबई महापालिकेने ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला याचे समाधान आहे. यामुळे मुंबईत रोजीरोटीसाठी येणारे कुणीही वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास त्यापायी वंचित राहणार नाही. मुंबई महापालिकेने कोविड काळात सर्व यंत्रणांची एकजुट करुन या अनपेक्षित संकटावर यशस्वीपणे मात केली होती. त्यासाठी महापालिकेसह, सिडको, म्हाडा, एमएसारडीसी यासारख्या यंत्रणाही सरसावून पुढे आल्या होत्या.”

धारावी सारख्या परिसरात ही सुविधा सुरू होत आहे. यात या परिसरात १५ दवाखाने असतील, याबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले, धारावी ही आशियातील वैशिष्ट्यपूर्ण वसाहत आहे. हा परिसर मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने न्याहाळला आहे. याठिकाणी राहणाऱ्यांचंही हक्काच्या घराचं स्वप्न असेल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुनर्विकासाच्या विकासक शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पुनर्विकासानंतरही ही वसाहत जगाचे लक्ष वेधून घेईल. मुंबईतील शिक्षण, आरोग्य , रस्ते अशा गोष्टींच्या विकासावर भर देत आहोत. मुंबई स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.” मुंबईतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यातील अन्य भागांतही आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विस्तार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

सुरवातीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेच्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. मंत्री श्री. केसरकर, श्री. लोढा तसेच खासदार श्री. शेवाळे यांची समयोचित भाषणे झाली. आयुक्त तथा प्रशासक चहल यांनी प्रास्ताविक केले.

पहिल्या टप्प्यात ५२ ठिकाणी आणि पुढे २२७ ठिकाणी सुरु होणार दवाखाने;

दवाखान्यांमध्ये वैद्यकीय तपासण्यांसह औषधोपचार व १४७ चाचण्यांची सुविधा

योजनेत आताच्या काही दवाखान्यांमध्ये दुस-या सत्रात आणि मोकळ्या जागेत पोर्टा केबिनमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ५२ दवाखाने सुरु करण्यात येत आहेत. तर साधारणपणे पुढील सहा महिन्यात २० पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर यासह १४९ ठिकाणी दवाखाने सुरु करण्यात येणार आहे. या योजनेत २२७ ठिकाणी आरोग्य व वैद्यकीय सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
या दवाखान्यात मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार व किरकोळ जखमांवर मलमपट्टी, तसेच १४७ प्रकारच्या रक्त चाचणी मोफत पुरवण्यात येणार आहेत याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, इत्यादी चाचण्या करिता पॅनल वरील डायग्नॉस्टीक केंद्राद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात करण्यात येतील.

प्राथमिक आरोग्य सेवा मोफत व सोईच्या वेळेनुसार सहज उपलब्ध होईल. नागरिकांचा औषध उपचारावर खिशातून होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. योजनेत साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येमागे १ दवाखाना, याप्रमाणे पोर्टा केबिन मधील दवाखाने हे सकाळी ७ ते दुपारी २, त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० या कालावधी दरम्यान कार्यरत असणार आहेत. तर उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरु करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरु करण्यात येत आहेत.

उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून विशेषज्ञांच्या सेवा या दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत देण्यात येत आहे. दवाखान्यांची दर्जोन्नती करून (कान-नाक-घसा तज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ञ आदी) विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत देण्यात येणार आहे.

दवाखान्यांमधून टॅब पद्धतीने व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येईल. दवाखान्याचे कामकाज हे विना कागद पद्धतीने (पेपरलेस) असणार असून त्यामुळे हे दवाखाने इकोफ्रेन्डली असणार आहेत.