ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, वैद्यकीय शिक्षणाबाबत सरकारची मोठी घोषणा..

डाॅक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.. मात्र, त्या तुलनेत राज्यात वैद्यकिय महाविद्यालयांची संख्या नाही.. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांची सर्वोच्च कसोटी लागते..

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची वानवा लक्षात घेऊन शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये लवकरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical college) उभारली जाणार आहेत.. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नुकतीच तशी घोषणा केली.. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..

4 हजार कोटींचे कर्ज घेणार…

वैद्यकिय शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, की “राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. त्यासाठी ‘एशियन डेव्हलपमेंट’कडून 4000 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे.. शिवाय, केंद्र सरकारही काही प्रमाणात निधी देणार आहे. त्यामुळे लवकरच वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना सुरुवात होईल.”

गेल्या 5 वर्षांत राज्यात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही बाब निदर्शनास आणून दिली.. त्यानंतर एकमताने हा निर्णय घेण्यात आला. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या सरकारी मेडिकल कॉलेजचा फायदा होणार असल्याचे मंत्री महाजन म्हणाले..

कुठे होणार महाविद्यालये? : गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर व वर्धा.

दरम्यान, 12 पैकी 6 जिल्हे विदर्भातील, तर बाकी 6 जिल्हे उर्वरित विभागातील आहेत. त्यामुळे नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला झुकते माप दिल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून फक्त अहमदनगरचा समावेश केल्याचे बोलले जात आहे..