मुलचेरा:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत भूमि अभिलेखातील नोंदी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ईकेवायसी पूर्ण करणे या बाबींची लाभार्थ्यांकडून पूर्तता करून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत दिनांक ०५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रुपये २ हजार हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रुपये ६ हजार लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ईकेवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील एक लाख ५१ हजार शेतकरी पात्र असून त्यापैकी एक लाख 48 हजार (98 टक्के) लाभार्थ्यांनी ईकेवायसी पूर्ण केलेली आहे.
मोहिमेंर्गत लाभार्थीची स्वयं नोंदणी व इकेवायसी साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तसेच आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे. त्यानुसार भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoRनुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या लाभार्थीनी सदर बाबीची पूर्तता या विशेष मोहिमेमध्ये करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding – No) लाभार्थीनी संबंधित तलाठी / तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे KYC व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत कार्यपूर्तता करावी.
पी.एम.किसान योजनेचा 17 वा हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 17 वा हप्ता वितरणापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी करून तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी कळविले आहे.