ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परिक्षणासाठी पाठवता येणार

गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत आहे.

 अशातच आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासंदर्भात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर जास्तीत जास्त भर द्यावा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

 तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत माती परिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी नमुना पाठविण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी पोस्टाद्वारे माती परीक्षणाला चांगला प्रतिसाद दिला तर वेळ आल्यास विद्यापीठातील माती परिक्षण केंद्रांची संख्याही वाढवली जाईल असे कृषी मंत्री मुंडे म्हणाले आहेत.