ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्याचे जीवन सुसह्य होणे गरजेचे

देसाईगंज:- शेतकरी अडचणीत असून त्याला जीवन जगणे कठीण झालेले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सर्वांनाच जीवन जगण्यासाठी अन्न लागते व ते पिकवण्याचे काम शेतकरी करतो. परंतु आज शेतकऱ्याला शेती परवडेनाशी झालेली आहे. खताच्या किंमती दुपटीने वाढल्या, कीटकनाशके व बियाण्यांच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ झाली. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करण्याच्या खर्चात सुद्धा वाढ झाली. अशा रीतीने उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खर्चाच्या तुलनेत हमीभाव मिळाला नाही. मोठ्या प्रमाणावर महागाई वाढलेली असतांना सुद्धा शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. करिता त्याला हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यात नरभक्षी वाघांनी व रानटी हत्तींनी अनेक शेतकऱ्यांचे जीव घेतले. कृषी पंपाला दिवसा वीज न देता ती रात्रीला फक्त आठ तास दिली जाते त्यामुळे शेतकऱ्याला रात्रोला शेतावर जाण्याशिवाय पर्याय नाही. परंतु त्याला सतत वाघांची व रानटी हत्तींची भीती सतावत असते. शासनाने व प्रशासनाने या समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे असतांना मात्र फोल आश्वासनं दिली जातात. अशा फोल आश्वासनांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी केले.

देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कुरुड येथे शारदा उत्सव मंडळ कुरुडच्या वतीने आयोजित उपकार या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिप उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, माजी सरपंच मनोहर निमजे, अविनाश गेडाम, ओबीसी विभाग प्रदेश सचिव मनोज ढोरे, दिवाकर मेश्राम, दिनेश ठाकरे, शामराव ढोरे, शंकर पारधी, महादेव ढोरे, विजय कुंभलवार, गणमान्य मंडळी व प्रेक्षक उपस्थित होते.