महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यूयॉर्क टाइम्समध्ये सौरऊर्जेचा कराराबाबत बातमी आल्याने विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला आहे. २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोध आक्रमक होणार आहेत. काँग्रेसने हा मुद्दा पकडण्यात दिरंगाई केली नाही. या करारातील भ्रष्टाचाराबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. अदानीच्या अटकेसोबतच त्यांनी या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणीही केली आहे.
यासंदर्भात राहुल गांधी म्हणाले की, आम्ही हा मुद्दा उपस्थित करत आहोत. विरोधी पक्षनेता म्हणून हा मुद्दा मांडण्याची जबाबदारी माझी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या माणसाचे १०० टक्के संरक्षण करत आहेत. या माणसाने भ्रष्टाचार करून भारताची संपत्ती मिळवली आहे. अदानींचा भाजपला पाठिंबा आहे, आम्ही याचा पुनरुच्चार करू. जेपीसीमार्फत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अदानींना अटक व्हावी ही आमची मागणी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पण आम्हाला माहित आहे की त्यांना अटक होणार नाही कारण भारताचे पंतप्रधान अदानींना पाठिंबा देतात, ते त्यांचे आश्रयदाते आहेत.
हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधक सर्वतोपरी प्रयत्न करतील. विरोधकांच्या मतांकडे दुर्लक्ष केल्यास अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. या गदारोळात घोषणाबाजीतून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात येणार आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी इंडिया आघाडीची बैठक होणार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीबाबत इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अधिवेशन काळात कोणते मुद्दे उपस्थित करायचे, याबाबत बैठकीत रणनीती आखली जाणार आहे. यामध्ये वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, एक राष्ट्र, एक निवडणूकसारखे मुद्दे असतील. मात्र, आता सौरऊर्जा करारातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात आल्याने हा मुद्दा विरोधकांच्या अजेंड्यामध्ये सर्वात अगोदर असेल. विरोधक आपली एकजूट दाखवत केंद्र सरकारला प्रत्येक मुद्द्यावर कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न करतील.
