ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जनुकविज्ञानाच्या अभ्यासातून भविष्यातील पिढ्या वाचवण्याचे पवित्र काम – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. 11 : जनुकविज्ञानाच्या (जेनेटिक सायन्स) माध्यमातून केवळ आजारांचे निदान करणे एवढेच नाही तर आजारांची कारणे आणि त्यावरील उपचार शोधणे आदी सर्व बाबी करुन भविष्यातील अनेकाअनेक पिढ्या वाचवण्याचे अत्यंत पवित्र काम केले जाते, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या (एमयुएचएस) पुणे विभागीय केंद्राने उभारलेल्या डॉ.घारपुरे स्मृती जेनेटिक प्रयोगशाळा व कर्करोग संशोधन केंद्राचे (जीन हेल्थ) उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर (से. नि.), राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, इंडियन ड्रग रिसर्च असोसिएशन ॲण्ड लॅबारेटरीचे चेअरमन सुहास जोशी, विद्यापीठाचे प्रति कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते.

सर्व नवीन ज्ञान हे अंतिमत: प्रयोगशाळेत निर्माण होते अशी आपली भावना असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, पूर्वी वैद्य प्राचीन वैद्यकीय ज्ञानाचा वापर करुन स्वत: निदान करायचे आणि स्वत:च औषधे बनवायचे. आता आधुनिक ॲलोपॅथी उपचार पद्धतीत औषध निर्माते, निदान प्रयोगशाळा, विशेषज्ञ डॉक्टर्स, औषधे, उपचार साधने यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा अशी एक साखळी आहे. परंतु, या साखळीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे म्हणजे येथे होत असलेले शोध, नाविन्य, संशोधन आहे. या आरोग्य विज्ञानातील प्रारंभिक बाबी आहेत. यानंतर डॉक्टर निदान आणि त्याआधारे उपचार करतात.

आरोग्य क्षेत्रातील संशोधन, आजारांचा शोध, रोगनिदान आणि उपचारपद्धतीचा शोध आदी बाबी तपश्चर्या आणि खूप कालावधीची प्रक्रिया आहे. त्यासाठी मोठा संयम, सहकार्य, समर्पणाची आवश्यकता असते. जनुकीय विज्ञानाच्या क्षेत्रात सखोल ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हे आवश्यक आहे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.

यावेळी कुलगुरु ले. जन. कानिटकर म्हणाल्या, दृष्टीकोन आणि त्यानुसारची कृती जग बदलू शकते. हे लक्षात घेऊन तसेच शिक्षण, सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि आरोग्यासाठी संशोधन या बाबी एकत्र कशा करता येईल हा दृष्टीकोन ठेऊन या ‘मॉलेक्युलर डायग्नोस्टिक इन जेनेटिक’ लॅबची उभारणी करण्यात आली आहे. हे करत असताना या केंद्राचे रुग्णाची काळजी हे मध्यवर्ती काम राहील. त्यासोबतच जेनेटिक्स विषयात क्षमता बांधणी व अभ्यासक्रम राबवणे आणि त्याचसोबत संशोधनाचे महत्त्वपूर्ण काम येथे केले जाईल. ही प्रयोगशाळा राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांना या क्षेत्रातील निदानांसाठी उपलब्ध असेल असेही त्या म्हणाल्या. या क्षेत्रातील आजारांचे निदान अत्यंत खर्चिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्यंत वाजवी दरात या प्रयोगशाळेमुळे तपासण्या होतील, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मृदुला फडके यांचा ध्वनीचित्रफीत संदेश दाखवण्यात आला. तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नॅशनल एड्स संशोधन संस्था (नारी) तसेच अन्य संस्थांशी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असे ‘मेंटल हेल्थ ॲण्ड नॉर्मल्सी ऑगमेंटेशन सिस्टीम’ अर्थात ‘मानस ॲप’ चे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप अत्यंत उपयुक्त असून त्यामध्ये प्रादेशिक भाषांची व्यवस्था केल्यास अधिक लोकांपर्यंत पाहोचेल असे राज्यपाल यावेळी म्हणाले.

कार्यक्रमास ‘नारी’ रोष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस), विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेजसह अन्य वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सी-डॅकचे प्रतिनिधी, राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि स्नायू विज्ञान संस्थान, बेंगळुरूचे (निमहान्स) चे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.