ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पोलिस भरतीचा मार्ग मोकळा, ‘या’ उमेदवारांचा होणार मोठा फायदा…

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वीच 14,956 जागांसाठी पोलिस भरतीची घोषणा केली होती. त्यांनतर, तांत्रिक कारणामुळे ही भरती लांबणीवर गेल्याची बातमी आली. मात्र, नेमकी कशामुळे भरतीला स्थगिती देण्यात आली, हे समजत नव्हते. अखेर हा तांत्रिक मुद्दा दूर झाला असून, राज्यातील पोलिस भरतीचा मार्ग खुला झाला आहे.

खरं तर कोरोना काळातच अनेक उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, नंतर तत्कालिन सरकारने राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध घातले. त्यात पोलिस भरतीही रखडली. कोरोना काळात पोलिस भरतीचा (Maharashtra Police Recruitment) फॉर्म भरलेल्या उमेदवारांपैकी अनेक जण ‘एजबार’ झाले होते. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांना या भरतीत संधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.

कमाल वयोमर्यादेत वाढ

काही उमेदवारांनी राज्य  सरकारकडे दादही मागितली होती. त्याची दखल घेत, राज्य सरकार व गृह विभागाने मोठा निर्णय घेताना, पोलिस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात अर्ज केलेल्या, मात्र वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना पोलिस भरतीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

पोलिस भरतीसाठी राज्य सरकार प्रवर्गानुसार कमाल वयाची अट ठरवते. वयाेमर्यादा ओलांडल्यास इच्छूक उमेदवार भरतीतून आपोआप बाहेर होतो. कोरोनामुळे गेली 2 वर्ष नोकरभरती झाली नाही. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने आधीच वयोमर्यादेत वाढ केली आहे. पोलिस भरतीसाठीही वयाेमर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे.

जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत, ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. एक वेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पोलिस भरतीसाठी पात्र असतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एजबार झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.