आता नवीन वर्ष 2025 च्या स्वागतासाठी काही दिवस उरले आहेत. 1 जानेवारी येताच केवळ कॅलेंडरच बदलणार नाही तर हे नवीन वर्षासोबत असे अनेक नियमदेखील येणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नवीन वर्षात कोणते नवीन नियम येणार आहेत? जाणून घेऊया.
सेन्सेक्सची मासिक एक्स्पायरी
1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स 50 ची मासिक एक्स्पायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल. सेन्सेक्सचे साप्ताहिक करारही शुक्रवारऐवजी मंगळवारी संपतील. सध्या, सेन्सेक्सची मासिक मुदत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी असते, तर बँकेक्सचे मासिक करार दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी संपतात आणि सेन्सेक्स 50 चे करार दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतात.
नवीन कार घेणे महाग
नवीन वर्षात 1 जानेवारीला सकाळपासून नवीन कार घेणे तुमच्यासाठी महाग होणार आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, होंडा, ऑडी इत्यादी अनेक कार कंपन्यांनी आपल्या गाड्या महाग करणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.
ईपीएफओकडून दिलासा
नवीन वर्षात EPFO पेन्शनवर मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.
यूपीआय 123Pay
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन वर्षात UPI 123Pay ची मर्यादा देखील वाढवली आहे. आत्तापर्यंत या पेमेंट सेवेद्वारे कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार केले जाऊ शकत होते. नवीन वर्षात त्याची मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
एलपीजी (LPG) च्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केल्या जातात. 1 जानेवारी 2025 रोजी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीत काही बदल करतात की नाही? हे पाहणे महत्वाचे आहे.
कृषी कर्ज
भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा 2 लाख रुपये केली आहे. यापूर्वी ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती.
