राज्यस्तरीय कामगार केसरी, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३ विजेत्यांना बक्षीस वितरण
मुंबई, दि. ८ : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या पाल्यांना कला, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कामगारांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी मंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, मुंबई शहर तालिम मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, महेंद्र तायडे आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. खाडे म्हणाले, राज्यात राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यांचा वारसा राज्याने जोपासला आहे. कुस्ती क्षेत्रातही नवनवीन बदल आणि तंत्रज्ञान आले आहे. मातीवरील कुस्ती आता मॅटवर होत आहे. हा बदल कुस्तीपटूंनी स्वीकारावा. खेळ म्हटला, की यश- अपयश येत राहते. मात्र, खेळाडूंनी अपयशाने खचून न जाता यशासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी. कामगार कल्याण विभागाचे आयुक्त श्री. इळवे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेची माहिती दिली. माधवी सुर्वे यांनी आभार मानले.
अरू खांडेकर, कालिचरण सोलनकर विजेते
या राज्यस्तरीय कुमार केसरी स्पर्धेत अरू हिंदुराव खांडेकर, तर राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धेत कालिचरण झुंजार सोलनकर यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना अनुक्रमे चांदीची गदा, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि ५० व ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय अभिनंदन बोडके याने द्वितीय, ओंकार शिवाजी मगदूम याने तृतीय, तर विवेक कृष्णाजी धावडे याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. दुसऱ्या गटात भारत संजय पवार याने द्वितीय, प्रथमेश बाबा गुरव तृतीय, तर तानाजी सोपानराव विटकर याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.