ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी जलजागृती सप्ताह 16 ते 22 मार्च दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

गडचिरोली, दि. 16 – भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच प्रत्येकाने घराघरात व कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले.

 

जलसंपदा विभागाच्या वतीने 16 ते 22 मार्च पर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे उद्घाटन गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात आज पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युथ अधिकारी अमित पुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अभियंता गणेश परदेशी, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरुण वसवाडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअरचे संस्थापक आणि जलसंवर्धन सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, तसेच जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या अधीक्षिका श्रीमती गुरपुडे उपस्थित होत्या.

यावेळी उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी जलजागृती सप्ताहाच्या उद्देशावर प्रकाश टाकला. तर कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण, जलप्रदूषण टाळणे, तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. यासोबतच जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये जलप्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

16 ते 22 मार्च या सप्ताहात जिल्हा, तालुका व गावपातळीवर जलप्रतिज्ञा, चर्चासत्रे, वेबिनार, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, कार्यशाळा, जलदिंडी, प्रभातफेरी आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्थळी भेटी यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमात श्री. पुंडे, श्री. वासवाडे, श्री. हेपट आणि श्रीमती गुरपुडे यांनी जलसंवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. भांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले.

उद्घाटन सोहळ्यात सर्व उपस्थितांनी सामूहिक जलप्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला जलसंपदा व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, प्रशिक्षणार्थी परिचारिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.