गाव नमुना एक हा महसुली लेख्यांचे आरंभ स्थान आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम १०२ अन्वये जमाबंदी लागू केल्याबरोबर जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ९४ ( ३ ) मधील सूचनेनुसार भूमी अभिलेख विभागातर्फे जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ८४ अन्वये भूमापन क्रमांक आणि त्याचे उपविभाग यानुसार क्षेत्र व आकारणी याचे विवरणपत्र तयार केले जाते.
गाव नमुना १ (जमिनींची नोंदवही) Gav Namuna 1:
जमीन महसूल संहिता, १९६६, कलम ९२ अन्वये महसुली भूमापन झाले नसले तरीही जमाबंदी लागू करता येते. याच विवरणपत्राच्या आधारे गाव नमुना एक तयार केला जातो. यात एकूण अकरा स्तंभ आहेत, ते खालीलप्रमाणे भरले जातात.
गाव नमुना एक – स्तंभ – १ मध्ये भूमापन क्रमांकाची नोंद असते.
गाव नमुना एक – स्तंभ – २ मध्ये भोगवटादार एक किंवा दोन किंवा सरकारी पट्टेदार यांपैकी असलेला प्रकार दर्शविण्यात येतो.
गाव नमुना एक – स्तंभ – ३ मध्ये एकूण क्षेत्राची नोंद हेक्टर – आर मध्ये करावी.
गाव नमुना एक – स्तंभ – ४- यांत एकूण क्षेत्रातून लागवडीस अयोग्य आणि उपलब्ध नसलेले बिनाआकारी क्षेत्र वजा करून ते कोणत्या प्रकारचे क्षेत्र आहे, म्हणजेच लागवडीसाठी का उपलब्ध होऊ शकत नाही, ( पोट खराब, नदी, नाले इ. ) त्याचा प्रकार लिहावा.
गाव नमुना एक – स्तंभ ५ – यांत वरील, लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकत नसलेले क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावे.
गाव नमुना एक – स्तंभ ६ – यांत एकूण क्षेत्रातून लागवडीस उपलब्ध नसलेले क्षेत्र वजा करून निव्वळ लागवड लायक क्षेत्र हेक्टर – आर मध्ये लिहावे.
गाव नमुना एक – स्तंभ ७ – यांत कृषिक आकारणी रुपये – पैसे मध्ये लिहावी.
गाव नमुना एक – स्तंभ ८ -ज्या ठिकाणी महसूल संहिता, १९६६, कलम १६५ अन्वये वाजिब उल – अर्ज ( राजस्थान किंवा सार्वजनिक प्राधिकरणाच्या मालकीच्या नसलेल्या पाणी किंवा जमिनीसंबंधात सार्वजनिक अधिकाराची नोंद असलेला अभिलेख ) तयार करण्यात /ठेवण्यात आलेला नाही तिथे हा स्तंभ महत्वाचा ठरतो. यांत सार्वजनिक मार्गावरील अधिकार आणि सुविधा अधिकारांचा उल्लेख करावा. वाजिब उल – अर्ज तयार करण्यात आला तर हा स्तंभ अनावश्यक ठरतो. ज्या गावात पाचपेक्षा कमी भूमापन क्रमांक ‘वन’ म्हणून अधिसूचित करण्यात आलेले असतील त्या गावात वनाबाबतचा आवश्यक सर्व तपशील या गाव नमुना क्रमांक एक च्या स्तंभ आठ मध्ये नोंदवला जातो.
गाव नमुना एक – स्तंभ ९ – यात जमिनीत काही काही फेरबदल करण्यात आला असेल तर त्याचा तपशील नमूद करावा.
गाव नमुना एक – स्तंभ १० – यात उपरोक्त प्रमाणे झालेला फेरबदल कोणत्या आदेशाने झाला आहे त्याचा आदेश क्रमांक सविस्तर नमूद करावा.
गाव नमुना एक – स्तंभ ११ – हा शेरा स्तंभ असून यात अकृषिक आकारणीतून माफी मिळालेल्या विहिरी, इमारती ( म.ज.म.अ. १९६६ कलम ११७ ) , व अन्य काही शेरे असल्यास नमूद करावे.
गाव नमुना एकचा कालावधी :
जमाबंदीच्या मुदतीपर्यंत हा नमुना अस्तित्त्वात राहील. या नमुन्याच्या तपशिलात वारंवार बदल होत असतात. या बदलांमुळे कृषिक आकारणीत बदल होत असतो, भूमापन क्रमांकाच्या क्षेत्रात बदल होत असतो, नवीन भूमापन क्रमांक तयार होत असतात. या प्रकारचे बदल (गाव नमुना एकच्या गोषवाऱ्यातील पाच प्रमुख शिर्षकांच्या क्षेत्र व आकारणीच्या बेरजेमध्ये झालेले बदल) तसेच लेखन प्रमदाची दुरुस्ती ( म.ज.म.अ. १९६६ कलम १०६ ) , बिन आकारी – बिन भोगवट्याच्या जमिनी प्रदान करणे ( म.ज.म.अ. १९६६ कलम २० ( १ ) ), आकार / बिन आकारी जमिनींचे अभिहस्तांकन ( म.ज.म.अ. १९६६ कलम २२), अकृषिक परवानगी ( म.ज.म.अ. १९६६ कलम ४४), अनधिकृत अकृषिक वापर नियमानुकूल करणे ( म.ज.म.अ. १९६६ कलम ४७ ( ब )), मळई जमीन ( म.ज.म.अ. १९६६ कलम ६५), पाण्याने वाहून गेलेली जमीन ( म.ज.म.अ. १९६६ कलम ६६ ) , इत्यादींमुळे जमिनीच्या क्षेत्रात बदल होत असतो. असे बदल जिल्हा निरीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाला कळवावे व त्यांचा अभिलेख दुरुस्त करवून घेऊन त्यांच्याकडून रेखा चित्र आणि नकाशासह कमी – जास्त पत्रक तयार करवून घ्यावे. आणि त्यानुसार स्तंभ ९ आणि १० मध्ये योग्य त्या नोंदी कराव्यात.
हा नमुना जुना किंवा जीर्ण / खराब झाल्यास तहसिलदाराने त्याच्या पुनर्लेखनाचे आदेश दयावेत, तलाठी यांनी सदर आदेशानुसार अचूक पुनर्लेखन करून त्यावर सही करावी व तहसिलदाराने पुनर्लिखित नमुना तपासून त्यावर सही करावी.