मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यू बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांची प्रार्थनास्थळे आणि संस्थांच्या देखभालीसाठी शासन नक्की प्रयत्न करेल, असे आश्वासन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने २७ जानेवारी हा ‘आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट दिन’ म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पर्यटन विभाग आणि इस्त्राईल कॉन्सुलेटतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, इस्त्राईलचे वाणिज्यदूत कोबी शेनॉन तसेच वाणिज्यदूत कार्यालयाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, १९३३ ते १९४५ या कालावधीत इस्त्राईलमध्ये घडलेल्या घटनांचे तसेच विदारक वास्तवाचे दर्शन या छायाचित्रांमधून दिसते. आजचा दिवस दुसऱ्या जागतिक महायुद्धात बळी पडलेल्या निष्पाप लोकांप्रती शोक व्यक्त करण्याचा असल्याचेही ते म्हणाले.
