मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन उभारले आहे. या दालनात मतदार यादी, मतदार नोंदणी, निवडणूक यासंबंधी माहिती इथे येणाऱ्या अनुयायांना मिळणार आहे.
गेल्या वर्षभरात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेली ‘लोकशाही समजून घेताना’ आणि ‘कशासाठी ? लिंगभाव समतेसाठी’ ही पुस्तके तसेच, निवडणूक आयोगाची निवडणुकीसंबंधी विविध प्रकाशने प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत.
निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता यासंबंधीचे ल्यूडो, सापशिडी हे खेळ दालनात ठेवण्यात आले आहेत. या खेळांतून मतदार जागृती करण्याचा मानस असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
