वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणात जर तुम्हाला चलन आले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे. जरी मेसेज आला नाही तरी आता मोबाईलवर तुमच्या वाहनाला आलेली चलने पाहता येतात. यामुळे ती तपासत रहा, नाहीतर तीन महिन्यांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले जाणार आहे.
लायसन रद्द झाल्यानंतर जर तुम्ही वाहन चालविताना अपघात झाला तर विना परवाना वाहन चालविल्याचा आणि अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा तर दाखल होईलच परंतू वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी विमा देखील मिळणार नाहीय.
दंडाची पावती न भरलेल्यांना कोर्टाची नोटीस पाठविली जाते. तिथे सेटलमेंट होते. परंतू, असेही अनेक नग असतात जे या नोटीसलाही जुमानत नाहीत. यामुळे आता मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दंडाची वसुली करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी हे केले जात आहे. नियमांचा नवीन मसुदा तयार केला जात आहे. यानुसार वाहन मालकांना ३ महिन्यांच्या आत ट्रॅफिक ई-चलान भरावे लागेल, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाऊ शकते.
तसेच ज्या लोकांनी एका आर्थिक वर्षात सिग्नल तोडला किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याची तीन चलन घेतली आहेत. त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाणार आहेत. याचबरोबर या प्रस्तावात विम्याचा प्रिमिअमदेखील वाहतूक ई चलन प्रणालीशी जोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यानुसार ज्याचे चलन न भरलेले असेल त्याला विम्याची जास्त रक्कम भरावी लागू शकते.
ई-चलनच्या वसुलीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा ६२-७६% दरासह पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच दिल्लीमध्ये सर्वात कमी १४% रिकव्हरी रेट तर कर्नाटकमध्ये २१ टक्के रेट आहे.
