अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे आयटीआय इमारतीचे उद्घाटन संपन्न
मुंबई, दि. 26 : जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता मिळू शकेल. तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी येत्या काळात शासनामार्फत विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
चेंबूर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) इमारतीचे आज उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सध्या पदवी इतकेच महत्त्व कौशल्याला प्राप्त झाले आहे. पदवीसोबत कौशल्य असेल तर त्याला अधिक मागणी आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाने कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना प्रभावी कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून आज चेंबूर येथे सुरू होत असलेल्या आयटीआयमधून याला चालना देण्यात येईल. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या परिस्थितीत संधीची समानता यामुळे तयार होईल. देशामध्ये असलेले सर्वोत्तम व्यवसाय अभ्यासक्रम या आयटीआयमध्ये सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी आयटीआयचा उपक्रम स्तुत्य – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले की, आजच्या काळात नोकरीसाठी प्रभावी कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. चेंबूरमध्ये अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असलेल्या आयटीआयमधून या समाजातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल. आयटीआयसाठी भव्य इमारत बांधण्यात आली असून शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. परिसरातील अनुसुचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
आयटीआयमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यातील सर्वच आयटीआयचे बळकटीकरण करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. उद्योगांमधील बदलते तंत्रज्ञान आणि त्यांच्या मागणीप्रमाणे आयटीआयमधील अभ्यासक्रम आणि यंत्रसामग्रीत बदल करण्यात येत आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. चेंबूर येथे आज सुरू होत असलेल्या आयटीआयला राज्यातील एक सक्षम आयटीआय बनविण्यात येईल. येथे प्रशिक्षणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास केंद्राचाही प्रारंभ
या आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्रही सुरु करण्यात आले असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व इलेक्ट्रीकल वायरमन या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. साधारण 3 ते 6 महिन्यांचे अल्पमुदतीचे विविध अभ्यासक्रम या केंद्रावर विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत.
आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम शिकण्याची संधी
या आयटीआयमध्ये विजतंत्री, तारतंत्री, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इंटेरिअर डिझाईन अॅण्ड डेकोरेशन, प्रशितन व वातानुकुलीत टेक्नीशियन, ड्राफ्ट्समन ऑर्क्टीचर, लेदर गुड्स मेकर, फुटवेअर मेकर, आयओटी टेक्निशियन अशा 10 व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 2 तुकड्या 440 प्रशिक्षणार्थ्यांकरीता सुरु करण्यात येणार आहेत. या व्यवसायातील प्रवेश शैक्षणिक वर्ष 2023- 24 पासून डी. जी. नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त करून सुरु करण्यात येणार आहेत.