मुंबई, दि. 15- मुंबई शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, इमारती आणि रस्त्यांवरील विद्युत प्रदीपन, कोळीवाड्यांचा विकास आदी माध्यमातून मुंबईचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, सर्वश्री आशीष शर्मा, डॉ.संजीव कुमार, पी.वेलरासू, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.सुपेकर, महापालिकेच्या संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.केसरकर यांनी महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. सुरू असलेल्या कामांना गती देऊन ते कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरात सौंदर्यीकरण आणि नियमित स्वच्छतेव्यतिरिक्त व्यापक स्वच्छता कामांचा एकत्रित शुभारंभ येत्या 15 दिवसांत करावा, कोळीवाड्यांच्या विकासासाठी सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करून अडचणी तातडीने दूर कराव्यात, रोजगार आणि स्वयंरोजगार या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करावी, कोळीवाड्यांसह शहरातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण कराव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मुंबईकरांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी लहान लहान फिरती तपासणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत, याचाच एक भाग म्हणून लवकरच 50 चाचणी केंद्रे सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुंबई शहरात रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर आढावा घेऊन पालकमंत्री श्री.केसरकर यांनी महिलांसाठी खास स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामध्ये साधनांची विविध पर्याय देण्याची सूचना त्यांनी केली. मंदिरे आणि पर्यटनस्थळांवर पार्किंग सुविधेसह इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, शिक्षण क्षेत्रात मुंबईचा लौकिक वाढेल यासाठी आणखी प्रयत्न करावेत, उंच इमारतींमधील आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
मुंबईतील पर्यटक आकर्षणाचे केंद्र असलेल्या काळाघोडा, बाणगंगा, कोळीवाडे आदी ठिकाणी पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर नियमित कार्यक्रम आयोजित करावेत. दक्षिण मुंबईतील इमारती, शिवाजी पार्क, वरळी परिसरातील रस्ते आणि इमारती आदी ठिकाणी कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करावी, अशा सूचनाही मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिल्या.