मुंबई, दि. ३१ :- राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना तसेच महानगरपालिका अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि, आवश्यकतेनुसार नाविन्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध भागांमध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, सर्वश्री आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकर, महानगरपालिकेतील संबंधित विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना जेथे निधीची अथवा यंत्रसामग्रीची आवश्यकता आहे, तेथे त्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पुरविल्या जातील, असे सांगितले. शहरातील मलनि:सारण करणाऱ्या वाहिन्या दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांच्या देखभालीचे सर्वोत्तम पर्याय वापरा, असेही त्यांनी सांगितले.
श्री. केसरकर म्हणाले, नागरिकांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा देताना महालक्ष्मी मंदीर, हाजीअली परिसरात पार्किंगची सुविधा निर्माण करावी. सौंदर्यीकरण करताना अत्यावश्यक सेवांना प्राधान्य द्यावे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. शहरातील जलतरण तलावांची संख्या वाढवावी, कामगार मैदान येथे उपलब्ध असलेल्या जलतरण तलावाचा विकास करून ऑलिंपिक दर्जाचे मैदान, रनिंग ट्रॅक तयार करावे. यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये मलनि:सारण वाहिनी, पाणीपुरवठा, स्मशानभूमी, शौचालये आदी मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात यावा. चौपाट्यांवर स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रात मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नाव उज्ज्वल व्हावे, यादृष्टीने दर्जा वाढवून मुंबईचा पॅटर्न निर्माण करावा, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासनाकडून मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित केला जातो. यातील ओल्या कचऱ्याचे जागेवरच कंपोस्टिंग करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आधुनिक यंत्रांचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी फिरती रूग्णालये तयार करावीत, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारी केंद्रे उभारावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
