मुंबई, दि. 25 : जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. जागतिक बँकेच्या सहयोगातून राज्यात महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
जागतिक बँकेच्या प्रमुख शिक्षण तज्ज्ञ शबनम सिन्हा यांच्यासह कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आयटीआयचे संस्थात्मक बळकटीकरण करणे, उद्योगांशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयमधील पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे, ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन कौशल्य केंद्रांची निर्मिती करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन केंद्रे निर्माण करणे, स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करणे यासारख्या कौशल्य विकासाच्या विविध मुद्यांवर त्यासोबत रोजगारक्षम कौशल्य शिक्षणासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.