मुंबई, दि. १० : महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता सक्षम महिला ,सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम महिला व बालविकास विभागामार्फत दि.१ डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासकीय महिला वसतिगृहातील महिला व इतर गरजू महिलांसाठी कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार असल्याची माहिती कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती आर. विमला, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दीपा ठाकूर, महिला व बाल विकासचे सह सचिव श्री. अहिरे एकात्मिक बाल विकास आयोगाचे विजय क्षीरसागर उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, महिलांच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकच व्यासपीठ असावे यासाठी तालुका ते राज्यस्तरापर्यंत सक्षम महिला, सक्षम महाराष्ट्र (जनसुनावणी) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुका ते राज्यस्तरापर्यंत तक्रारीचे निवारण होईपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येईल, यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना सर्वांना कळविण्यात येतील.
महिलांसाठी कौशल्य विकास विभागामार्फत रोजगारभिमुख प्रशिक्षण देणार
शासकीय महिला वसतीगृहातील प्रवेशित तसेच इतर गरजू महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी मेंहदी, ब्युटीशियन, शिवणकाम, एब्रॉयडरी, आदरातिथ्य प्रशिक्षण सारखे रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. निवासी संस्थाची तपासणी करण्यासाठी आयुक्तालय स्तरावरून भरारी पथकांचे गठन करावे. दत्तक प्रक्रिया,अनाथ प्रमाणपत्र याचे वाटप विहित वेळेत करावे, अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी दिल्या.
महिला व बालविकास विभागाची पदभरतीची कार्यवाही तातडीने करावी. मुंबईतील एसआरए इमारतीत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी यांची सद्यस्थिती, मुंबईमध्ये कंटेनर, अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत केलेली कार्यवाही, प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय राबविण्यात येणारे उपक्रम, गुजरात राज्याच्या धर्तीवर माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रस्तावाबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.
मानवी तस्करी, बालविवाह यासंदर्भात, राज्य महिला आयोगामार्फत महिलांना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन तात्काळ मिळावे यासाठी लीगल क्लिनिक सुरू करणे, विधवा प्रथा निर्मूलन याबाबत सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.
